विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ७४-चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी ९, १३ व १९ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम ७७ मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार चिमूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी शनिवार ९ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी बुधवार, दि. १३ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी मंगळवार १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे करण्यात येईल.
७४-चिमूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद सिंग हे वरील दिनांकास व वेळेस उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे चिमूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी कळविले आहे.
