विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्ह्यातील पाहिल्या दोन लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. यामध्ये प्रथम रोहित जंगम यांना कौशल्य विकास विभागात व प्रवीण बोरघरे जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नियुक्तीचे आदेश देण्यात आले.
यावेळी कौशल्य विकास, रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त निता औघड, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त स्वप्नील वालदे यांची उपस्थिती होती. कौशल्य विकास, रोजगार, व उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात सुरू झालेल्या महत्वकांक्षी उपक्रमाला प्रतिसाद लाभत असून पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून कौशल्य व आत्मविश्वास निर्माण व्हावा, या हेतुने ही योजना सुरू झालेली असून शासकीय व खाजगी आस्थापनांना कुशल मनुष्यबळ प्राप्त होणार आहे.
उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या अंतर्गत १२ वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा ६ हजार रुपये, आयटीआय अथवा पदविका असलेल्यांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
