Latest Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला सहायक आयुक्त निता औघड, जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे रु.हू. ठाकुर, धिरज मनवर, सागर आंबेकर व अतुल वर्हेकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शासकीय आस्थापनांना एकूण मंजूर पदाच्या ५% उमेदवार नियुक्त करता येतील. तसेच खाजगी आस्थापनांना उत्पादन क्षेत्रात मंजूर पदाच्या १०% व सेवा क्षेत्रासाठी मंजूर पदाच्या २०%उमेदवार नियुक्त करता येतील. जिल्ह्यात ३० जुलै पर्यंत शासकीय व खाजगी आस्थापना मिळून १ हजार ३०६ पदे अधिसूचित झालेली असून यामध्ये १६८ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. यासाठी १२ वी पास प्रशिक्षणार्थींना ६ हजार, आयटीआय, पदविका असणाऱ्यांना ८ हजार आणि पदवीधर तसेच पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे.

शासकीय व खाजगी आस्थापनांनी जिल्ह्याच्या rojgar.mahaswayam.gov.in या महास्वयम पोर्टलवर रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असून सर्व तांत्रिक बाजू समजून घ्याव्या, असे निर्देश दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss