Latest Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

– आता बेरोजगार युवकांना भरघोस विद्यावेतना सह सहा महिने मिळणार अनुभवाची संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्यातील असंख्य युवकांना आपले शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात वनवन फिरावे लागते. युवकांना विद्यावेतनासह आपण घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा ६ हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना ८ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना १० हजार असे भरघोस विद्यावेतन दिले जाणार आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दरमहा जमा करण्यात येईल, या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १०% व सेवा क्षेत्रासाठी २०% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या ५% इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येईल. आस्थापना किंवा उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती संकेतस्थळावर अचुक दर्शविणे आवश्यक राहील.

लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था आणि विविध आस्थापनानी  आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवावी. किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. सदर उद्योग किंवा आस्थापना महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना किंवा उद्योग संकेतस्थळावर नोंदणीकृत असावी.

या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल ३५ वर्ष असावे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभागाशी संपर्क साधता येईल. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss