– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ९ हजार ६०४ उमेदवारांची पोर्टलवर नोंदणी
– २३३ आस्थापनांद्वारे विविध पदे अधिसूचित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ९ हजार ६०४ उमेदवारांची पोर्टलवर नोंदणी झालेली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत शासकीय व खाजगी क्षेत्रातील २३३ आस्थापनांनी विविध पदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत ८००उमेदवार या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. नोंदणीकृत उमेदवारांनी आपली नोंदणी अद्ययावत करून आपल्या आवडीच्या आस्थापनेची निवड करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आर्थिक वर्षापासून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत १५ ते ३५ वयोगटातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. रोजगार इच्छुक उमेदवारांना ६ महिन्याकरिता त्यांच्या शैक्षणिक अर्हतानुसार विद्यावेतन दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये मंजूर पदाच्या ५ टक्के तसेच उद्योग, महामंडळ तथा खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत पदाच्या १०टक्के किंवा २० टक्के पदे शासन निर्णयाप्रमाणे कार्यालयामध्ये भरणेबाबत अंमलबजावणी सुरु झालेली आहे. या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी व अधिक माहिती करीता तालुकास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर या कार्यालयास ०७१२-२५३१२१३ संपर्क साधावा.
