Latest Posts

मुख्यमंत्री योजनादूत मध्ये तेराशे हून अधिक उमेदवारांनी केले अर्ज

– १३ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ६४० योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून आज सकाळ पर्यंत १ हजार ३९५ उमेदवारांची नोंदणी झाली आहे.

राज्य शासनाचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय हे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा समजले जाते. शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय व शासकीय कार्यक्रमांची प्रसिद्धी जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून महासंचालनालय प्रभावीपणे करत असते. शासकीय योजनांचा लाभ राज्यातील अधिकाधिक नागरिकांना होण्याच्या उद्देशाने शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात ६४० योजनादुतांची होणार निवड. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने जिल्ह्यात एकूण ६४० योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.

योजनेचे स्वरुप- प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

आवश्यक पात्रता- या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा.

उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे- मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची मुदत- १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Latest Posts

Don't Miss