Latest Posts

छत्तीसगडमध्ये रेल्वे अपघातात दहा ठार : दोन डझन प्रवासी जखमी

– बिलासपूरजवळ पॅसेंजर गाडीला मालगाडीची जोरदार धडक; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : रायगडहून येणारी पॅसेंजर रेल्वे वेगात असताना मालगाडीवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास छत्तीसगडमधील बिलासपूरजवळ लालखदान परिसरात हा भयावह अपघात घडला. धडकेनंतर कोरबा-पॅसेंजर ट्रेनचे अनेक डबे रुळाखाली उतरले व पूर्णपणे चेंगरले गेले. अपघातानंतर ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी अवस्थेतील प्रवासी आणि नातेवाईकांना पाहून अनेकजण हादरले. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

माहिती मिळताच बिलासपूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, आरपीएफ, जीआरपीचा ताफा व मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरच्या सहाय्याने डबे फोडण्याचे काम सुरू आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अंधारामुळे कामात काही अडचणी येत आहेत. लोको पायलट केबिनमध्ये अडकलेले असून मृत आणि जखमींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.

या ट्रेनमध्ये विदर्भासह महाराष्ट्रातील प्रवासीही मोठ्या संख्येने असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्यासंदर्भातील अधिकृत माहिती वृत्तलिहिस्तोवर उपलब्ध झालेली नाही.

दरम्यान, या अपघातानंतर बिलासपूर–कटनी रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काही एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या नागपूरमार्गे वळविण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत —
बिलासपूर स्टेशन : ७७७७८५७३३५,
पेंड्रा रोड : ८२९४७३०१६२,
दुर्घटनास्थळी मदतीसाठी : ९७५२४८५४९९, ८६०२००७२०२.

Latest Posts

Don't Miss