विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): दिवाळीचा सण संपत असला तरी छठपूजेच्या उत्सवामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवरील आणि गाड्यांमधील गर्दी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विविध प्रांतातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये – जा सुरू असल्याने रेल्वे प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील विविध स्थानकांवरून एकाच दिवशी तब्बल २३ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीनंतर रोजगाराच्या ठिकाणी परतणारे प्रवासी तसेच छठपूजेसाठी जाणाऱ्या भाविकांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये हाऊसफुल परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, भुसावळ अशा प्रमुख स्थानकांवर पाय ठेवायलाही जागा नाही. प्रवाशांच्या या वाढत्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना प्रवासात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नागपूरहून सुटणाऱ्या गाड्या –
मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार नागपूरहूनही चार विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
ट्रेन क्रमांक ०१४१० नागपूर–पुणे विशेष : सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.१० वाजता नागपूरवरून सुटणार. वर्धा, अकोला, भुसावळ, मनमाड, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाइन मार्गे पुण्याला पोहोचेल. या गाडीत एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, अकरा शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य कोच असतील.
ट्रेन क्रमांक ०१०१२ नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) विशेष : सोमवार रात्री १०.१० वाजता नागपूरहून सुटणार. ही गाडी वर्धा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, ठाणे, दादर मार्गे मुंबईत पोहोचेल.
नागपूरकडे येणाऱ्या गाड्या –
ट्रेन क्रमांक ०१४०१ पुणे–नागपूर विशेष : सोमवार रात्री ८.३० वाजता पुण्यावरून सुटेल. दौंड, अहिल्यानगर, भुसावळ, अकोला, वर्धा मार्गे नागपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०१२०२ हडपसर – नागपूर विशेष : सोमवार दुपारी ३.५० वाजता हडपसरहून सुटेल. दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, भुसावळ, अकोला, वर्धा मार्गे नागपूरला धावेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी या सर्व गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य वर्गाचे अतिरिक्त कोच लावण्यात आले असून रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आगाऊ आरक्षण करून सुरक्षित आणि नियोजित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
