विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे विभागीय कार्यालय एमआयडीसी परिसर सेवाग्राम रोड वर्धा येथे २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यासाठी संपूर्ण मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यामध्ये १२ वी पास असणाऱ्या उमेदवारांना ६ हजार प्रतिमहिना, आयटीआय किंवा पदविका असणाऱ्या उमेदवारांना ८ हजार रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर असणाऱ्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येणार आहे.
ज्या उमेदवारांनी यापुर्वीच https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलव्दारे एसटी महामंडळाला अर्ज सादर केले आहेत त्यांनी सुध्दा या मेळाव्यासाठी उपस्थित रहावे. मेळाव्यात उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सुध्दा करता येईल, असे विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.
