विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची आणि अधिकाराची जाणीव करून देणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या मतदान जनजागृती रथाला नागपूरचे निवडणूक निरीक्षक संतोषकुमार मिश्रा आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अजय चारठाणकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, साप्रविचे अधीक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात स्वीप कार्यक्रमांतर्गत नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे मतदान जनजागृती रथ तयार करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे, याकरिता जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध अभियान राबविण्यात येत आहेत. मतदान जनजागृती रथ हादेखील याचाच एक भाग आहे. मतदान जनजागृती रथ शहरातील सहाही विधानसभा मतदान क्षेत्रात फिरून मतदारांना आपल्या मताधिकाराबद्दल जागरूक करणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदान करावे, यासाठी संपूर्ण शहरभर रथ जनजागृती करणार आहे.
