– दुचाकीच्या धडकेनंतर पेटली बंगळुरूला जाणारी खासगी बस; प्रवाशांचे हृदयद्रावक वर्णन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / तुमकुर (कर्नाटक) (karnatka): बंगळुरूला जाणाऱ्या एका खासगी बसला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका दुचाकीची बसला धडक बसताच बसने पेट घेतला आणि काही क्षणातच संपूर्ण वाहन ज्वाळांनी वेढले गेले. या भीषण घटनेने परिसरात एकच आरडाओरड माजली.
अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते. त्यापैकी १९ जणांचे जळालेले मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले असून, मृतांमध्ये दोन बालकांसह दुचाकीस्वाराचाही समावेश आहे. काही प्रवाशांनी खिडक्या फोडून आणि उड्या मारून थरारक पद्धतीने जीव वाचवला.
अपघाताची प्राथमिक माहिती अशी की, इंधन टाकीचे झाकण उघडे असलेली दुचाकी बसखाली गेल्याने आग भडकली. काही सेकंदांतच बस पेटली आणि प्रवाशांना बाहेर पडण्यास वेळच मिळाला नाही.
दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, आम्ही झोपेत असतानाच जोराचा धक्का बसला. काही सेकंदांत धूर आणि आगीचा भडका उडाला. जीव वाचवण्यासाठी खिडक्यांच्या काचा फोडून आम्ही बाहेर उड्या मारल्या.
बसच्या आतील सजावटीसाठी वापरलेले पडदे, बेड आणि प्लास्टिकचे साहित्य अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत २० निरपराध जीव जळून खाक झाले होते.
पोलीसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला असून मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
