Latest Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलीं प्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.

या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, सन २०२५ – २०२६ मध्ये स्वाधार योजनेच्या https://hmas.mahait.org  या पोर्टलद्वारे नागपूर जिल्हयात तसेच तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता सदर संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे जाहीर आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. अधिक माहिती साठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकिय आय. टी. आय समोर, श्रध्दानंद पेठ, दिक्षाभुमी चौक, नागपूर येथे संपर्क साधावा.

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष –
विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थ्यांस शासकीय वसतिगृहात मिळालेला प्रवेश रद्द करुन म्हणजेच वसतीगृहातील जागा रिक्त करुन स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमतः वसतीगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल व तद्नंतर गुणानुक्रमेच स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रर्वगाचा असावा. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. सदर योजना तालुका स्तरावर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागु करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/ तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत / शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.

Latest Posts

Don't Miss