विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि शासकीय रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.
माहितीनुसार, बावधन बुद्रुक येथील के.के. कन्स्ट्रक्शन येथे बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. हेरिटेड एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.
बावधन भागामध्ये ऑक्सफर्ड गोल्फ अँड काऊंटी नावाचे रिसॉर्ट असून तिथे एक हेलिपॅड आहे. याच हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहूच्या दिशेने उड्डाण घेतले होते. मात्र पहाटेच्या सुमारास धुके जास्त असल्याने डोंगराळ भागात हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले. हेलिपॅडपासून दीड किलोमीटर अंतरावरच हा अपघात झाला. यात दोन पायलटसह एका इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला.
