– ठोस पुरावे आढळले नाहीत – उच्च न्यायालय
विदर्भ न्युज एक्सप्रेस-
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी (Ghantji): संशयित आरोपीच्या रेकॉर्डवर ठोस पुरावे नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ येथील हत्याकांडातील दोन आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अनिल पानसरे व राज वाकोडे यांनी हा निर्णय दिला.
संशयित आरोपी शेख सलमान शेख अहमद व शेख इम्रान शेख महेमूद अशी आरोपींची नांवे आहेत. तिसरा आरोपी शेख हुसेन शेख मेहबूब कुरेशी याचे अपील प्रलंबित असतांना त्याचे निधन झाले. २० ऑगस्ट २०२० रोजी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने या तिघांना जन्मठेप व इतर शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी ॲड. राजेंद्र डागा (नागपूर) यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. ते अपील उच्च न्यायालयाने मंजूर केले आहे.
मृतकाचे नांव अकील शाह होते. १३ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री ११ च्या सुमारास अकीलचा आरोपींसोबत वाद झाला होता. त्यानंतर रात्री १२ च्या सुमारास पोबारू ले – आऊट येथे आरोपींनी अकीलची धारदार चाकूने वार करून हत्या केली, अशी तक्रार करण्यात आली होती.
सदर प्रकरणात उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. राजेंद्र डागा (नागपूर) यांनी युक्तीवाद केला.
