विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : केंद्र सरकारच्या निरोगी भारत उपक्रमांतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय कन्सल्टन्सीव्दारे ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारांवर डॉक्टरांचा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला मोफत मिळतो. त्यामुळे किरकोळ आजारावरील उपचारासाठी ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज. पराडकर यांनी केले आहे.
वेगवेगळ्या ऋतुमध्ये अनेक दुखणे, साथीचे आजार बळावतात. त्यामुळे डॉक्टरांकडे औषध उपचारांसाठी जावे लागते. डॉक्टरकडे गेल्यावर लागणारा वेळ आणि विविध तपासणी पाहता अनेकदा रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जेष्ठ नागरिक व अन्य रुणांना घरबसल्या सुविधा मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही सेवा सुरू केली आहे.
ई-संजीवनी किंवा टेलीमेडीसीन ऑनलाइन ओपीडीचा लाभ घेण्यासाठी http://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करुन किंवा ई-संजिवनी ॲप डाऊनलोड करुन ऑनलाइन उपचारांसाठी वेळ घेता येईल. सोमवार ते रविवार दररोज सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजता पर्यंत व दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. या सेवेव्दारे वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिल्यानंतर ॲपमध्ये प्रिस्क्रिप्शन उपलब्ध होते. त्यानंतर जन औषधी केंद्रातून स्वस्त दरात किंवा शासकीय रुग्णालयातून औषधी उपलब्ध करुन घेता येईल.
जिल्ह्यात या सेवेसाठी ४४ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये आयुर्वेदिक, ऍलोपॅथिक अशा डॉक्टरांचा सल्ला रुग्णांना घेता येतो. जिल्ह्यात ५६१ रुग्णांनी ऑनलाइन ओपीडीचा लाभ घेतला असून जिल्ह्यातील नागरिकांनी ई- संजीवनी किंवा टेलीमेडीसीन ऑनलाइन ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
