विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्यात वकिलांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने तीव्र भूमिका घेतली आहे. या हल्ल्यांचा निषेध नोंदवत वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली असून, ३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत.
मुंबई येथे २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बार कौन्सिलच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भात सखोल चर्चा करून ठराव पारित करण्यात आला. राज्यातील विविध ठिकाणी वकिलांवर हल्ले, मारहाण आणि काहींच्या हत्याही झाल्याने कायदा लागू करण्याची आवश्यकता असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका साक्षीदाराने उलट तपासणीदरम्यान चिडून वकिलावर प्राणघातक हल्ला केला होता. अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेवर परिणाम होत असून वकिलांचे संरक्षण ही वेळेची गरज आहे, असे बार कौन्सिलचे मत आहे.
या ठरावाची प्रत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच जिल्हा न्यायालयांच्या प्रधान न्यायाधीशांना पाठविण्यात आली आहे. सर्व जिल्हा आणि तालुका वकील संघटनांनी ठरावाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कायद्याच्या मसुद्यावर सुधारणा प्रलंबित –
वकील संरक्षण कायद्याचा मसुदा राज्यातील सर्व वकील संघटनांना पाठविण्यात आला होता. अनेक संघटनांनी त्यावर महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविल्या असून हा सुधारित मसुदा राज्याच्या महाधिवक्त्यांकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे बार कौन्सिलने स्पष्ट केले आहे.
