विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने शासकीय, निमशासकीय/ शाळा/ महाविदयालय/ महामंडळ ई. संस्थांनी आपल्या कार्यालयातील मनुष्यबळाची माहिती ३० ऑगस्ट पर्यंत होती. परंतु अद्याप पावेतो विहीत प्रपत्रात अनेक कार्यालयाने अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती सादर केलेली नाही. या बाबत संबंधित कार्यालयांना वेळोवेळी लेखी सूचना देऊनही यात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आढळून आले आहे. यात अधिक विलंब लावल्यास अशा कार्यालय प्रमुखावर गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
ज्या शासकीय/निमशासकीय/शाळा/महाविदयालय/महामंडळ ई. संस्था व कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही त्या कार्यालयांनी ७ ऑक्टोबरपर्यंत तात्काळ विहीत प्रपत्रात माहिती सादर करावी अन्यथा लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा निवडणूक विभागातर्फे देण्यात आला आहे. याच बरोबर माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित कार्यालयाचे माहे ऑक्टोबर २०२४ चे वेतन देयकेही शासकीय कोषागारात स्विकारले जाणार नाही, असे निवडणूक विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सादर करण्याचे विवरणपत्र Excel व HOD Certificate चा नमुना https://nagpur.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
