Latest Posts

अमृत संस्थेच्यावतीने मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): खुल्या प्रवर्गातील आर्थिदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक युवतींना रोजगाराची नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ड्रोन पायलटसाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व रोजगारक्षम बनविणे आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना दहा दिवसाचे डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना मिळणार आहे. या परवान्यामुळे कृषी, सर्वेक्षण, बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण आणि चित्रफीत निर्मिती अशा विविध क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होईल.

प्रशिक्षणात एकुण आठ प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये मध्यम व लघु वर्गातील ड्रोन प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, कृषि व आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, नकाशांकन व सर्वेक्षण, ड्रोन देखभाल दुरुस्ती आणि छायाचित्रण व चलचित्र निर्मितीचा समावेश आहे. प्रत्येक तुकडीमध्ये पंधरा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. हे प्रशिक्षण पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि परभणी येथील केंद्रावर आयोजित केले जाणार आहे. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही ते या योजनेस पात्र आहेत.

उपक्रमाचा लाभ अमृत लक्षित गटातील खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील ब्राम्हण, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, मारवाडी, ठाकूर, त्यागी, सेनुगुंधर, गुजराती, ऐयांगर, जाट, सिंधी, कानबी, राजपूत, कोमटी, हिंदू नेपाळी, भूमिहार जातीच्या लाभार्थ्यांस घेता येणार आहे. यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा व त्याचे वय १८ ते ५५ वर्ष दरम्यान असावे. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये पेक्षा कमी असावे. आणि तो १० वी उत्तीर्ण असावा.

पहिल्या तुकडीसाठी १० ते २० नोव्हेंबरपर्यंत www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अर्जाची छापील प्रत, ओळखपत्र, अधिवास व उत्पन्नाचा दाखला, फिटनेस प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रांसह अमृत कार्यालय, प्रशासकीय भवन येथे सादर करावा. जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी पुढील तुकडीसाठी ही नोंदणी करुन ठेवावी.

Latest Posts

Don't Miss