विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अकोला (Akola): शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांमध्ये काही अभिकर्ता संस्था आणि व्यापाऱ्यांनी हातमिळवणी करून मोठा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील सात ज्वारी खरेदी केंद्रांवर तब्बल ५ हजार ३८३ क्विंटल ज्वारीची खरेदी १९३ शेतकऱ्यांच्या नावावर खोटी दाखवण्यात आली असून, यामुळे १.८१ कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार, २०२४-२०२५ च्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रांपैकी सात केंद्रांत हा प्रकार घडला आहे. बीम पोर्टलवर नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यांमध्ये बदल करून त्यांच्या नावावर ज्वारी खरेदी दाखवण्यात आली. प्रत्यक्षात, ही ज्वारी व्यापाऱ्यांकडून आणून शासकीय खरेदी केंद्रांवर दाखवण्यात आली होती.
या गैरप्रकारात सहभागी असलेल्या संस्थांची नावे आढळली आहेत, ज्यात संत नरसिंह महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी, वक्रतुंड एफपीओ, अकोला आणि बार्शिटाकळी तालुका विक्री संघ यांचा समावेश आहे. समन्वय समितीच्या अहवालावरून जिल्हाधिकारी डॉ. वर्षा मीना यांनी तत्काळ कारवाईचा आदेश दिला आहे. शासकीय योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक सहन केली जाणार नाही. जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांवर कारवाई –
या प्रकरणात संत नरसिंह महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनीला पाच वर्षांसाठी सर्व खरेदी कामांतून वगळण्यात आले आहे. उर्वरित सहा संस्थांवर प्रत्येकी १ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आले आहे, तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांचा कमिशन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
