Latest Posts

प्रशासनाच्या विशेष मोहिमेतून जिल्ह्यात ३८ हजार ६३७ मतदारांची वाढ : जिल्हाधिकारी विनय गौडा

– मतदार याद्या प्रसिध्द, नागरिकांनी आपले नाव तपासण्याचे आवाहन

– स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरामध्येही वाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यात प्रामुख्याने नवमतदारांची नोंदणी, मयत किंवा स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणे, मतदार यादीत त्रृटी असल्यास त्यात दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात तब्बल ३८ हजार ६३७ मतदारांची वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यात आता १ हजार पुरुष मतदारांमागे ९६५ स्त्री मतदार असून लिंग गुणोत्तर ९ ने वाढल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

पुढे जिल्हाधिकारी गौडा म्हणाले १ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादी ३० ऑगस्ट २०२४ ला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, ते लगेच तपासावे, जेणेकरून कोणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. तसेच निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नाव नोंदणी किंवा नाव वगळणे ही प्रक्रिया सुरू राहते. त्यामुळे नागरिकांनी वेळात वेळ काढून संबंधित ठिकाणी जावून आपले नाव तपासावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात ३८ हजार ६३७ मतदारांची वाढ –

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात एकूण १७ लक्ष ९२ हजार १४७ मतदार होते. यात आता ५१ हजार १२५ मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून १२ हजार ४८८ नावे मयत किंवा स्थलांतरीत झाल्यामुळे वगळण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात ३८ हजार ६३७ मतदारांची वाढ झाली असून जिल्ह्यात आता एकूण १८ लक्ष ३० हजार ७८४ मतदार आहेत. यात ९ लक्ष ३१ हजार ८२१ पुरुष मतदार, ८ लक्ष ९८  हजार ९१८ स्त्री मतदार तर ४५ इतर मतदारांचा समावेश आहे.

१८ ते १९ वयोगटातील  ३३ हजार ८२५  युवा मतदार : जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची संख्या १० हजार ४८८ ने वाढली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघ मिळून ३३ हजार ८२५ युवा मतदार आहेत. यात १८ हजार ८०१ पुरुष, १५ हजार २२ स्त्री आणि २ इतर मतदार यांचा समावेश आहे.

मतदान केंद्रांची संख्या, ८५ वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदार : जिल्ह्यात एकूण २ हजार ७६ मतदार केंद्र असून राजूरा विधानसभा मतदार संघात-३४४, चंद्रपूर – ३९०, बल्लारपूर – ३६६, ब्रम्हपूरी – ३१९, चिमूर – ३१४ आणि वरोरा विधानसभा मतदार संघात ३४३ मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात ८५ वय आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या १३ हजार ९८७ आहे. तर दिव्यांग मतदार एकूण ८ हजार ४९६ आहेत.

मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा –

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सहभाग नोंदविता यावा, यासाठी सर्व मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. यासाठी मतदार यादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा व्होटर्स हेल्पलाईन ॲप अथवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलद्वारे अर्ज नमुना क्रमांक ६ भरून आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss