Latest Posts

प्रचंड पावसातही ९९ टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा

– महिला उमेदवारांची १०० टक्के उपस्थिती.

– पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील २६ उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढुन त्यांना परिक्षा केंद्रावर पोहचविण्यात आले.

– एकुण ६ हजार ७११ उमेदवारांमधून ६ हजार ६५७ उमेदवारांनी दिली लेखी परिक्षा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२-२३ प्रत्यक्ष भरती २०२४ च्या ९१२ जागांसाठी आज २८ जुलै २०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलातर्फे लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व अत्यंत पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलामार्फत पार पाडण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलातर्फे ९१२ पोलीस शिपाई पदांसाठीची मैदानी चाचणी ही २१ जून २०२४ ते १३ जुलै २०२४ रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती.

सदर मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण ६ हजार ७११ उमेदवारांसाठी लेखी परीक्षा ही आज २८ जुलै २०२४ रोजीचे सकाळी ०८.०० वा. आयोजीत करण्यात आलेली होती. यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी १०.३० ते १२.०० या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी १३.३० ते १५.०० वा. दरम्यान घेण्यात आला.

सदरची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील १) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, २) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), ३) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, ४) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, ५) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, ६) स्कुल ऑॅफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, ७) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, ८) शिवाजी इंग्लीश ॲकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, ९) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, १०) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, ११) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकुण ११ केंद्रावर घेण्यात आली. सर्व ११ परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. बंदोबस्ताकरीता ८०० चे आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती. सदर लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण ६ हजार ७११ उमेदवारांपैकी ६ हजार ६५७ पुरुष व महिला उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली.

सदर लेखी परिक्षेपासुन कोणतेही पात्र उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. यासोबतच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्राभरात पुरपरिस्थिती निर्माण झालेली असतांना सुद्धा पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील २६ उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले व त्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचविण्यात आले. त्यामुळे लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांपैकी १०० टक्के महिलांसह ९९ टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावली. यासोबतच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणीचे पुन:परिक्षण करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले. तसेच पेपर क्र. ०१ व पेपर क्र. ०२ च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची व पाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली होती.

सदर लेखी परीक्षा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.

Latest Posts

Don't Miss