विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महावितरणच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यामध्ये विदर्भातील वीज ग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात विदर्भातील तब्बल २४ लाख ४० हजार १२४ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांनी १ हजार १८२ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा सुरक्षित व घरबसल्या ऑनलाईन भरणा केला आहे. विदर्भात एकूण वीज ग्राहकांपैकी ऑनलाईन वीज बील भरणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल ६५.६७ टक्के आहे, याशिवाय नागपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी तब्बल विदर्भातील भरणा झालेल्या एकूण ऑनलाईन रकमेपैकी ४४.२४ टक्के रकमेचा भरणा करीत विदर्भात आघाडी घेतली आहे.
महावितरणकडून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी आधुनिक जीवनशैलीशी सोबत सुसंगत सर्व प्रकारची ग्राहक सेवा एका क्लिकवर डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहे. प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत बराच वेळ उभे राहून, कार्यालयीन वेळेत वीजबिल भरण्याऐवजी ऑनलाईनद्वारे घरबसल्या व २४ तास वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांसाठी www. mahadiscom.in ही वेबसाईट सोबतच मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे. तसेच एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीज जोडण्यांचे बिल ऑनलाईन भरणे तसेच सर्व वीज जोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.
सप्टेबर महिन्यात नागपूर जिल्ह्यातील ७ लाख ३१ हजार ९८ वीज ग्राहकांनी ५२२ कोटी ९१ लाख रुपयांचा बील भरणा ऑनलाईन पद्धतीने केला, याशिवाय अकोला जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ७८१ वीज ग्राहकांनी ५७ कोटी ८८ लाख, बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ७४४ वीज ग्राहकांनी ६८ कोटी ५८ लाख, वाशिम जिल्ह्यातील ६६ हजार ७५५ वीज ग्राहकांनी २१ कोटी १२ लाख, अमरावती जिल्ह्यातील ३० लाख ६ हजार ९९७ ग्राहकांनी ११० कोटी २४ लाख, यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख ४ हजार ८३९ ग्राहकांनी ७६ कोटी ९५ लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ९०८ ग्राहकांनी ११२ कोटी ८४ लाख, गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ६०७ ग्राहकांनी ३० कोटी २१ लाख, भंडारा जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ८६५ ग्राहकांनी ५७ कोटी ७७ लाख, गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ४५ ह्राहकांनी ३६ कोटी ७१ लाख तर वर्धा जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ४८५ ग्राहकांनी ८६ कोटी ७९ लाख रुपयांचा बील भरणा ऑनलाईन पद्धतीने केला.
वीजबिलांचा ऑनलाईन पद्धती भरणा करणे सोयीचे व सुरक्षित आहे. या पद्धतीला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. तसेच ऑनलाईनद्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच दिली जाते. वीजबिलांचा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाईन भरणा केल्यास वीज बिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीने वीज बिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
