विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बहिणीबाबत आक्षेपार्ह संदेश केल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर काठीने हल्ला करून मारहाण केल्याची गंभीर घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी आर्या अनिल हजारे (वय १८) , रा. नांदगाव (पोडे) याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो आपल्या आई-वडिलांसह व १६ वर्षीय मावस बहिणीसोबत वास्तव्यास आहे. दरम्यान, गावातील प्रफुल गुंटीकवार याने त्याच्या मावस बहिणीबाबत आक्षेपार्ह कमेंट करून ती माहिती त्याच्या चुलत भावाच्या मोबाईलवर पाठविली होती. ही बाब समजल्यानंतर फिर्यादीने संबंधितास जाब विचारण्याचा निर्णय घेतला.
२९ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास फिर्यादीने प्रफुल गुंटीकवार याला बहिणीबाबत चुकीचे मेसेज का पाठवले? असा जाब विचारला असता दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर लगेचच भांडणात झाले. यावेळी आरोपी ईसाक रामदास गोरडवार, गोलु कोरवते, रोहित दुधाराम मेडीपेल्लीवार, गणपत मेडीपेल्लीवार, यश चंदनगीरीवार, निखील आत्राम व रवी सुधाकर चंदनगीरीवार हेही घटनास्थळी येऊन त्यांनी एकत्रितपणे फिर्यादीला हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीच्या वेळी गोलु कोरवते याने काठीने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे तो जखमी झाला. तसेच, आरोपी ईसाक रामदास गोरडवार याच्या हातात धारदार शस्त्र (बरसी) असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, फिर्यादीचा मावस भाऊ राहुल अरुण मिटपल्लीवार हा मध्यस्थी करण्यासाठी धावून आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले.
याचबरोबर आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १८९(१), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रदीप सोनुने करीत असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक प्रयत्नशील आहे.
