Latest Posts

हनुमान जयंती पार्श्वभूमीवर बल्लारपूरात पोलिसांचा रूट मार्च : कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आगामी २ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बल्लारपूर पोलिसांकडून आज शहरात रूट मार्च काढण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा सुधीर नंदनवार यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला. सदर रूट मार्च सायंकाळी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून सुरू झाला. गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, गांधी पुतळा, जामा मस्जिद, असमा चौक मार्गे मुख्य मार्गाने पुन्हा पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे त्याची सांगता करण्यात आली.

या रूट मार्चचा उद्देश शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची सज्जता दर्शविणे हा होता. पोलिसांनी मार्गावरील संवेदनशील ठिकाणांचा आढावा घेत नागरिकांना शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन केले.

रूट मार्चमध्ये एकूण ६ अधिकारी, २५ पोलीस कर्मचारी तसेच ८ सैनिक सहभागी झाले होते. यामध्ये पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम, विक्की लोखंडे, वैभव चव्हाण व मनोहर मडावी यांचा समावेश होता.

दरम्यान, हनुमान जयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss