Latest Posts

बल्लारपूर : बामनी येथील ५१ वर्षीय इसमाची गळफास लावून आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील बामनी येथे एका ५१ वर्षीय इसमाने सोमवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. महादेव काशीनाथ तितरे असे मृतकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव तितरे हे आपल्या कुटुंबासह बामानी येथे वास्तव्यास होते. सोमवारी (३० तारखेला) दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात कोणीही नसल्याचे पाहून महादेव यांनी छताला गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर कुटुंबीय घरी परतले असता हा प्रकार उघडकीस आला.

व्यसनाधीनतेची प्राथमिक माहिती –
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत महादेव यांना दारूचे व्यसन होते. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या नैराश्यातून किंवा कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पोलीस तपास सुरू –
सध्या बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्रीनाथ गिराम आणि महेश कुकुडकर पुढील तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच आत्महत्येचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Latest Posts

Don't Miss