विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-व (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य (सन २०२५-२६) योजना राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी १० हजार रुपये व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी पाच हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे कळविण्यात येते. ऑनलाईन किंवा संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याचा अंतिम २७ एप्रिल असल्याचे कळविण्यात आले आहे.
सन २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबंधितांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा, अर्ज सादर करण्यापूर्वी सुचनांचे पालन करावे.
योजनेविषयी भविष्यात कोणतीही माहिती/सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील, (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू इत्यादी) उमेदवारांना अर्थसहाय्य देण्यात येते.
