विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): तालुक्यातील नांदगांव पोडे धर्मशाळा तुकूम परिसरातील शेतात असलेल्या विटाभट्टीवरील रोटरी मशीनला आग लावून तसेच बोअरवेलवरील पाण्याची मोटार कापून फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्तियाक अहमद मोहम्मद मुस्ताक सिद्धीकी (वय ४१), रा. बालाजी वॉर्ड, बल्लारपूर यांची धर्मशाळा तुकूम, नांदगाव पोडे येथे सुमारे दोन एकर शेती असून त्यांनी त्या ठिकाणी विटाभट्टी सुरू केली आहे. विटाभट्टीसाठी लागणारी इलेक्ट्रिक रोटरी मशीन त्यांनी २०२१ मध्ये नागपूर येथील एका व्यक्तीकडून खरेदी केली होती.
४ मार्च रोजी सकाळी ते शेतात गेले असता विटाभट्टीवरील मजूर होळीच्या सुट्टीसाठी गावाला गेले होते. दिवसभर भट्टीवर थांबल्यानंतर सायंकाळी सुमारे ५.३० वाजता ते घरी परतले. रात्री सुमारे ९.३० वाजता ट्रॅक्टरवरील मजुरांनी फोन करून विटाभट्टीवरील रोटरी मशीनला आग लावल्याची माहिती दिली.
घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची रोटरी मशीन पूर्णपणे जळालेली आढळली. तसेच बोअरवेलवर बसविलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार वायर कापून बोअरमध्ये फेकून दिल्याचे दिसून आले. या प्रकारात एकूण सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध कलम ३२४(२), ३२६(फ) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे करीत आहेत.
