Latest Posts

दालमिया कंपनीतील रासायनिक अपघाताची चौकशी करा : जखमींना ५० लाखांची मदत द्या – बंडू हजारे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): कोरपणा तालुक्यातील नारंडा येथे असलेल्या दालमिया सिमेंट कंपनीत घडलेल्या रासायनिक अपघाताची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून गंभीर जखमी कामगारांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पत्रपरिषदेत केली. मिळालेल्या माहितीनुसार, दालमिया सिमेंट कंपनीच्या नारंडा प्रकल्पात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सल्फ्युरिक अ‍ॅसिड टँकर अनलोडिंग प्रक्रियेदरम्यान गंभीर औद्योगिक अपघात घडला.

या दुर्घटनेत कंत्राटी कामगार स्वाती लक्ष्मण उईके (वय २५, रा. रमानगर, चंद्रपूर) व अक्षय विजय कन्नाके (रा. नारंडा, ता. कोरपणा) हे गंभीररीत्या रासायनिक भाजल्याने जखमी झाले. सध्या दोघांवरही चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून स्वाती उईके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

हजारे यांनी सांगितले की, सल्फ्युरिक अ‍ॅसिड हे अत्यंत धोकादायक रसायन टँकरमधून अनलोड करताना नोडर बाहेर निघाल्याने ते कामगारांच्या अंगावर उडाले आणि त्यांच्या पाठीमागील भागाला गंभीर भाजल्या गेल्या. मात्र कंपनी प्रशासनाने या घटनेला किरकोळ जखम असल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर जखमी कामगारांना कंपनीकडून प्रत्येकी किमान ५० लाख रुपये नुकसानभरपाई, संपूर्ण वैद्यकीय खर्च कंपनीकडून, उपचार कालावधीत पूर्ण वेतन तसेच कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी हजारे यांनी केली.

तसेच या घटनेची जिल्हास्तरीय उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती नेमून फॅक्टरी निरीक्षक, कामगार विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संयुक्त तपासणी करण्यात यावी. कंपनीचा सेफ्टी ऑडिट अहवाल, एसओपी, पीपीई वितरणाची नोंद तसेच सीसीटीव्ही फुटेज जप्त करून दोषींवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.

सदर मागण्यांवर सात दिवसांत निर्णय न झाल्यास शिवसेना (शिंदे गट) तर्फे दालमिया कंपनीच्या गेटसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही हजारे यांनी दिला.

या पत्रपरिषदेला युवराज धानोरकर व राजेश राठोड यांची उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss