Latest Posts

कौटुंबिक वादाचे हिंसक रूप : पतीला मारहाण, पानठेल्याची तोडफोड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : कौटुंबिक वादाचे पडसाद आता सार्वजनिक ठिकाणी उमटल्याची घटना विसापूर येथे घडली. पतीला शिवीगाळ करून मारहाण, धमकी तसेच पानठेल्याची तोडफोड केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, विसापूर येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये राहणारे अमित देवराव खेलूरकर (४४) हे स्वतःचा पानठेला चालवितात. त्यांच्या व पत्नी छाया अमित खेलूरकर यांच्यातील कौटुंबिक वादासंदर्भात महिला तक्रार निवारण केंद्रात चौकशी सुरू आहे. यापूर्वीही दोघांमधील वादावरून विविध तक्रारी पोलिसांकडे दाखल झालेल्या आहेत.

तक्रारीनुसार, १९ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजता अमित खेलूरकर हे त्यांच्या पानठेल्यावर असताना छाया खेलूरकर तेथे आल्या. सार्वजनिक रस्त्यावर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी छाया यांनी पतीचा कॉलर पकडून चप्पलने मारहाण केली तसेच नखाने ओरबाडल्याने उजव्या हाताला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, तुला कशात तरी अडकविल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पुढे पानठेल्याची तोडफोड करून तेथील साहित्य आणि रोख रक्कम घेऊन गेल्याने सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी छाया खेलूरकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११५(२), २९६, ३२४(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss