Latest Posts

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून १२ जुलै २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे.

सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत विद्यापीठाच्या जागतिक क्रमवारीतील २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज १२ जुलैपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्त्यावर सादर करावा. सदर योजनेसंबंधी शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss