विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : मध्य चांदा वन विभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रातील चनाखा नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक १६० मधून जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेलाइनवर रेल्वेच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत बिबट अंदाजे ३ वर्षाचा असल्याची माहिती आहे.
राजुरा वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या विहिरगाव उपक्षेत्राचे कक्ष क्रमांक १६० मधून मध्य व दक्षिण रेल्वे लाइन जाते. गुरुवारी दुपारच्या सुमारास या लाइनवरून रस्ता ओलांडतांना रेल्वेची धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी यांनी वरिष्ठांना कळविले. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी जावून मोका पंचनामा केला.
पुढील कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वनाधिकारी पवन कुमार जोग यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड करीत आहे.
आतापर्यंत परिसरात रेल्वेच्या धडकेत तीन वाघ व अन्य वन प्राणी ठार झाले आहेत.
