– मशागत करताना सावधान : हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी होण्याची शक्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण होऊन शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. बहुतांश शेती जंगलाला लागून असल्याने मशागतीची कामे करतांना वाघाचा हल्ला होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या एकट्या गहचिरोली तालुक्याच्या परिसरात १० वाघांचा वावर आहे.
खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागत आटोपून शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागले आहेत. असाच तूर, तीळ व विविध प्रकारचे भाजीपाला वर्गीय व शेंगावर्गीय पिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी शेतात मशागत करीत आहेत. या कालावधीत जंगलालगतच्या शेतात वाघांचा हल्ला नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांत पावसाळापूर्वी मशागतीची कामे करताना वाघांचे मानवावर हल्ले झाले आहेत.
वडसा व गडचिरोलीत सर्वाधिक वाघ –
जिल्यात प्रामुख्याने वडसा व गडचिरोली वन विभागात सर्वाधिक वाघ आहेत. वडसा वन विभागात २० च्या आसपास वाघ आहेत. कोंढाळा, फरी, रवी तसेच वैरागड, सिर्सी, मरेगाव जंगल परिसरात वाघांचा वावर आहे, तर गडचिरोली वन विभागातही १२ च्या आसपास वाघ आहेत. आलापल्ली वन विभागातही जवळपास ५ वाघांचा वावर आहे.
गुरवळा व चुरचुरातही वावर –
गडचिरोली वन परिक्षेत्रातील गुरवळा नेचर सफारी परिसरात सध्या सहा वाघांचा वावर आहे, तर पोर्ला वनपरिक्षेत्रात चार तर चालगाव वन परिक्षेत्रातही दोन वाघांचा वापर आहे. एकट्या गढचिरोली तालुक्यात १० वाघांचा वावर आहे.
केव्हा होऊ शकतो हल्ला?
जंगलालगतच्या शेतात वाकून कामे करताना वाघांचा हल्ला होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सकाळी व सायंकाळच्या सुमारास वाघ व बिबटे हे जंगलालगतच्या परिसरात भक्ष्याच्या शोधात असतात.
