विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): शहरातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) च्या खुल्या माईन्स परिसरालगत असलेल्या नाल्यात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह पूर्णतः कुजलेल्या स्थितीत असून केवळ हाडे शिल्लक दिसत असल्याने मृत्यूला अंदाजे आठ ते दहा दिवस उलटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास काही युवक वेकोली परिसरात गेले असता त्यांना नाल्यात एक मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे हलविला.
मृत इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून त्याने निळ्या रंगाची जर्किन व राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. मात्र मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी सुरू आहे. विशेष म्हणजे, बल्लारपूर पोलीस ठाण्यात आतापर्यंत अशा वर्णनाच्या व्यक्तीची बेपत्ता नोंद नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकण्यात आला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. वेकोली परिसरात चोरीच्या घटना घडल्या असल्याने संबंधित इसम चोरीच्या उद्देशाने आला होता का आणि पळताना नाल्यात पडून मृत्यू झाला का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
तसेच वेकोली परिसरात बाहेर राज्यातील मजूर मोठ्या प्रमाणावर कामासाठी येत असल्याने मृत इसम त्यापैकी कोणी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहे.
