Latest Posts

एलएसीवर आयटीबीपीच्या १० महिला सीमा चौक्यांची उभारणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली/जम्मू (New Delhi) : चीनबरोबरची ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीची दुर्गम, हिमाच्छादित आणि अतिसंवेदनशील वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) सुरक्षित ठेवणारे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दल लवकरच सीमा सुरक्षेत महिलांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करणार आहे.

या अत्यंत संवेदनशील सीमेवर १० पूर्णपणे महिलांच्या सीमा चौक्या स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आयटीबीपीचे महासंचालक प्रवीण कुमार यांनी जम्मू येथे झालेल्या ६४ व्या स्थापना दिवस परेडमध्ये दिली.

२०२० मधील लडाखमधील लष्करी संघर्षानंतर आयटीबीपीने फॉरवर्डायझेशन योजना राबवायला सुरुवात केली आहे. याअंतर्गत २१५ सीमा चौक्या महत्त्वाच्या व धोरणात्मक ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. या योजनांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने २०२३ मध्ये आयटीबीपीसाठी ९ हजार ४०० कर्मचाऱ्यांची भरती, सात नवीन बटालियन आणि एका सेक्टर मुख्यालयाला मंजुरी दिली आहे.

महिला जवानांचा वाढता सहभाग –
लडाखमधील लुकिंग आणि हिमाचल प्रदेशातील ठांगी येथे पूर्णपणे महिलांच्या दोन सीमा चौक्या उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, आणखी आठ महिला चौक्या लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे डीजी प्रवीण कुमार यांनी स्पष्ट केले.

सध्या आयटीबीपीकडे एक लाखांहून अधिक मनुष्यबळ असून दलाच्या चौक्या ९,००० ते १४,००० फुटांपेक्षा अधिक उंचीच्या कठीण व प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत आहेत. १९६२ मध्ये स्थापन झालेले हे दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत कामकाज पाहते.

Latest Posts

Don't Miss