विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरील एस.एन.डी.टी. विद्यापीठाजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या अॅक्टिव्हाने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिल्याने एक छायाचित्रकार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या अपघातात अॅक्टिव्हावरील महिला प्रवासीही जखमी झाली असून पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, धम्मदीप गोपाल दुर्याधन रा. बाबूपेठ, आंबेडकर वॉर्ड, चंद्रपूर हे व्यवसायाने छायाचित्रकार असून मंगळवारी रात्री कोठारी येथे हळदी समारंभाचे छायाचित्रण करून आपल्या होंडा लिओ क्रं एमएच-३४ बीजे-७३२९ या दुचाकीने चंद्रपूरकडे परत येत होते. दरम्यान, बल्लारपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरील एस.एन.डी.टी. विद्यापीठाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या होंडा अॅक्टिव्हा क्रं. एमएच-३४ सीएफ-५७६५ चालकाने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत धम्मदीप दुर्याधन रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तत्काळ बल्लारपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अॅक्टिव्हावरील महिला प्रवासी राणी कोल्हे हिलाही कपाळावर गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी धम्मदीप यांचे वडील गोपाल विठ्ठल दुर्याधन यांनी दिलेल्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी अॅक्टिव्हा चालक सुरजसिंग ठाकूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२५(अ), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ व १८५ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहेत.
