विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यावर लाकडी काठीने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना बल्लारपूर शहरातील सरदार पटेल वॉर्ड परिसरात घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जखमी चेतन राजू वर्मा (२५) हा गोवरी खदान येथे ठेकेदारी पद्धतीने सुपरवायझर म्हणून काम करतो. २० मे २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तो आरोपीच्या घरासमोर बसलेला असताना आरोपी छत्रपाल वर्मा याने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र चेतन वर्मा याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने लाकडी काठीने त्याच्या डोक्यावर प्रहार केला.
या हल्ल्यात चेतन वर्मा याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ रवि राजू वर्मा (२२) हा रुग्णालयात पोहोचला.
यानंतर रवि वर्मा यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी छत्रपाल वर्मा, रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारपूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार करीत आहेत.
