विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येते. इच्छूक जेष्ठ नागरिकांना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांकडून २५ जूनपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंर्गत ६५ वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मनःस्वास्थ, योगोपचार केंद्राद्वारे प्रशिक्षणाकरीता एकरकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डिबीटी प्रणालीद्वारे करण्यात येईल. या योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी उपकरणे खरेदी करता येईल तसेच केंद्र शासनाच्या सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो. शासन निर्णयाप्रमाणे नोंदणीकृत प्रशिक्षण केंद्रास सहभागी होता येईल.
६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक हा नागपूर जिल्हयातील ग्रामीण तथा शहरी भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक जेष्ठांनी २५ जूनपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर या कार्यालयात अर्ज करावा. सदर अर्जानुसार जे अर्जदार पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनेचा अर्ज या कार्यालयाची www.acswnagpur.inसंकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी पहिला माळा, शासकीय आयटीआय समोर, श्रध्दानंद पेठ, नागपूर २२ येथे संपर्क करावा.
