Latest Posts

आश्रमशाळेतील नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू : उपचारातील हलगर्जीपणाचा आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): तालुक्यातील पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी लक्ष्मी नैताम हिचा बुधवारी पहाटे गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे आश्रमशाळेतील आरोग्य व्यवस्थापन व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नैताम मागील तीन महिन्यांपासून आजारी होती. मात्र तिची प्रकृती अत्यंत खालावल्यावरच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थिनीच्या आरोग्याकडे वेळेत लक्ष का देण्यात आले नाही, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

पोटेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध असतानाही योग्य वेळी वैद्यकीय तपासणी व उपचार का करण्यात आले नाहीत, याबाबतही संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थिनी मृत्यूच्या दारात पोहोचल्यानंतरच उपचाराची औपचारिकता पार पाडली गेली का, असा गंभीर आरोपही काही पालकांनी केला आहे.

माहितीनुसार, विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला शनिवारी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यावेळी तिची स्थिती चिंताजनक होती. अखेर बुधवारी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आश्रमशाळेतील वैद्यकीय देखरेख, नियमित आरोग्य तपासणी आणि जबाबदारीबाबत शंका उपस्थित होत आहेत.

विद्यार्थिनीच्या मृत्यूस कोणाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र समिती गठित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोटेगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सहायक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार यांनी मात्र घटनेला दुजोरा देत पुढील चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

Latest Posts

Don't Miss