विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : एकोना कोल माईन्स येथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या महिला वरिष्ठ सुरक्षा प्रहारीला जातीवाचक शिवीगाळ, अश्लील शब्दप्रयोग, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
घटना ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत एकोना कोल माईन्सच्या कोल स्टॉक परिसरात घडली. सदर महिला सुरक्षा प्रहारी ड्युटीवर असताना वरिष्ठांच्या स्पष्ट आदेशानुसार कोल स्टॉक परिसरात कोणालाही प्रवेश देऊ नये, असे निर्देश होते. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास गणेश, मन्या व जीवन पिंपळशेंडे हे तिघे कोल स्टॉक परिसरात आढळून आले. सूचना दिल्यानंतर गणेश व मन्या बाहेर गेले; मात्र जीवन पिंपळशेंडे याने बाहेर जाण्यास नकार दिला.
त्यानंतर आरोपी जीवन पिंपळशेंडे याने महिला कर्मचाऱ्यास अत्यंत अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करत तू नीच जातची आहेस, तुझी औकात नाही, अशा शब्दांत अपमान केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्या अंगावर धावून जाऊन धक्का दिल्याने ती कोळशाच्या ढिगाऱ्यावर कोसळली. प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षक सुरेश आनंदराव उपासे व अजितकुमार प्रसाद यांनी मध्यस्थी करून तिला वाचविले. मात्र आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर आरोपीचा मालक गुलाम गोस सिद्दीकी याने मोबाईलवरून फोन करून माझ्या माणसावर हात का उचलला? असे म्हणत धमकावल्याचा आरोप आहे. यापूर्वीही ड्युटीच्या ठिकाणी विनाकारण धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असून, आरोपींकडून आपल्याला व आपल्या मुलांना जीवे मारण्याचा धोका असल्याची भीती संबंधित महिलेने व्यक्त केली आहे.
या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपी जीवन पिंपळशेंडे व गुलाम गोस सिद्दीकी यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, १९८९ अंतर्गत कलम ३(२)(v), ३(१)(r), ३(१)(s) तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १३२, २९६, ३५१(२), ३५१(४), ३२९(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी जीवन पिंपळशेंडे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल करीत आहेत.
