Latest Posts

दहावी-बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थीकडून दोन महिने तयारी करवून घेतली जाणार व पुनर्परीक्षा होणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / यवतमाळ (Yavatmal) : दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. त्यात तब्बल दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मात्र, आता या मुलांसाठी अतिशय सोप्या भाषेत अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या सोप्या अभ्यासक्रमाची त्यांच्याकडून दोन महिने तयारी करवून घेतली जाणार असून, त्यानंतर त्यांची पुनर्परीक्षा होणार आहे.

स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षेला जीवन-मरणाचा प्रश्न बनवून टाकले आहे, तर पालकांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला आहे. त्यामुळे नापास विद्यार्थी नाराज होऊन शाळाबाह्य होण्याचीही भीती आहे. अनेकांकडून आत्मघाताचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. त्यावर सोप्या अभ्यासक्रमाचा उपाय शोधण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नापासांकरिता हा सोपा अभ्यासक्रम तयार केला आहे. यात दहावी आणि बारावीच्या प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक-उपघटक सोप्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेला बसणाऱ्या दोन लाख अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी – एकूण : ८२ हजार २१९ – नियमित : ६४ हजार ८८५ – खासगी : ४ हजार ९६५, रिपिटर : १२ हजार ३६९

बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी – एकूण : १ लाख २२ हजार ७१३ – नियमित : ९४ हजार २८६ – खासगी : ५ हजार ८०७, रिपिटर : २२ हजार ६२०

शाळानिहाय यादी करा –
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी तयार करण्याचे निर्देश परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी सर्व शिक्षणाधिकारी आणि डायट प्राचार्यांना दिले आहेत. जून आणि जुलै असे दोन महिने या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन वर्ग घेतला जाणार आहे.

Latest Posts

Don't Miss